वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे होणार जलयुक्तची ५२ कामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:04 PM2018-03-13T14:04:00+5:302018-03-13T14:04:00+5:30
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येते. टंचाई लक्षात घेता आता उर्वरीत गावांतही जलसंधारणाची कामे प्रस्तावित केली जात आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात कोणत्या विभागाने किती कामे करावी, याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीतर्फे केले जाते. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकाºयांकडे ५२ कामांसाठी भरघोष निधीची मागणी नोंदविली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करून लघु सिंचन विभागाचा सिंचन अनुशेष दूर करणे, तलाव दुरूस्ती, टंचाईग्रस्त भागात कृत्रिम डोह निर्मिती आदी कामांना प्राधान्य देण्याची मागणी लावून धरली. एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाल्याने लवकरच ही कामे केली जाणार आहेत. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे व दुरूस्ती करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकूण ५२ कामे सूचविण्यात आली होती. सर्वाधिक कामे ही नाला खोलीकरण, सरळीकरण व रूंदीकरणाची असून, त्याखालोखाल पाझर तलाव, गाव तलाव व सिंचन तलाव दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.