आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील ५५ शिक्षक शाळेवर रूजू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:43 PM2018-06-25T17:43:59+5:302018-06-25T17:46:25+5:30
वाशिम - आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेले ७४ पैकी ५५ शिक्षक शाळेवर रूजू झाले आहेत.
वाशिम - आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेले ७४ पैकी ५५ शिक्षक शाळेवर रूजू झाले आहेत.
यावर्षी राज्यस्तरावरून शिक्षकांची बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडली. आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या ५८ शिक्षकांची अन्य जिल्ह्यात विनंतीवरून बदली झाली तर अन्य जिल्ह्यातून ७४ शिक्षक वाशिम जिल्ह्यात बदलून आले. वाशिम जिल्ह्यातून बदलून गेलेल्या ५८ शिक्षकांना वाशिम जिल्हा परिषदेतून यापूर्वीच कार्यमुक्त केले तर अन्य जिल्ह्यातून येणाºया शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मुख्यालयी रूजू करून घेतले होते. २६ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने रिक्त पदांवर या शिक्षकांची नियुक्ती केली. जवळपास ५५ शिक्षक रूजू झाले आहेत. जिल्ह्यांतर्गत १४०२ शिक्षकांची बदली प्रक्रिया यापूर्वीच राबविली असून, सर्व शिक्षक त्या-त्या शाळांवर रूजू झालेले आहेत.
दरम्यान, आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करीत विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद तसेच शासनस्तरावर निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली . पती-पत्नी एकत्रिकरणाचा नियम पाळण्यात आला नाही, निकषानुसार बदल्या झाल्या नसल्याने अनेक शिक्षकांना विस्थापित होण्याची वेळ आली, शिक्षकांवर अन्याय झाला असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली. मात्र, अद्याप न्याय मिळाला नसल्याने शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.