नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:15 PM2020-06-13T17:15:40+5:302020-06-13T17:15:59+5:30
नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम वाहून गेल्या ची घटना १२ जून रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्युज नेटवर्क
कामरगाव (वाशिम): कारंजा तालुक्यातील भुलोडा वापटी कुपटी या मार्गावरील नाल्याच्या पुरात ५५ वर्षीय इसम वाहून गेल्या ची घटना १२ जून रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. बाबुलाल मुकिंदा खडसे (५५, रा. वापटी कुपटी) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सास) सदस्यांनी शोधकार्य सुरू केले असून, वृत्त लिहिस्तोवर मृतदेह आढळून आला नव्हता.
वापटी कुपटी येथील रहिवाशी बाबुलाल खडसे हे खेर्डा बु येथे शिवणकाम व्यवसाय करीत होते. नेहमीप्रमाणे १२ जून रोजी ते खेर्डा येथे कामावर गेले. तेथून एम एच ३७, आर ८१८७ क्रमांकाच्या दुचाकीने परत येत असताना मार्गावरील नाल्यास आलेल्या पुरामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. दरम्यान कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यांची दुचाकी भुलोडा गावालगतच्या महादेव मंदिर परिसरात आढळून आली. वाहून गेलेल्या इसमाला शोधण्यासाठी सासच्या सदस्यांनी २० कि मी. अंतराच्या नाल्याच्या काठाने शोध मोहीम राबविली; परंतु वृत्त लिहिस्तोवर वाहून गेलेला इसम आढळून आला नाही. सदर शोधकार्यात स्थानिक युवकांसह ‘सास’चे अध्यक्ष श्याम सवाई यांच्या मार्गदर्शनात जलतरणपटू विजय भिसे, अरबाज गोचीवाले, अमीर चौधरी, उसमान गुंगीवाले यांनी परिश्रम घेत आहेत.