५८ वर्षाच्या इसमाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By सुनील काकडे | Published: September 8, 2023 08:26 PM2023-09-08T20:26:35+5:302023-09-08T20:27:02+5:30
आरोपीवर भादंविचे कलम कलम ३५४, सह कलम १२, पोस्को सहकलम अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधात्मक कायदा ३ (१) (डब्ल्यू) आदीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वाशिम : नातू-नातींना खेळविण्याच्या वयात एका ५८ वर्षीय इसमाने जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, मालेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी ८ सप्टेंबर रोजी सकाळी पिठगिरणीवर दळण दळून आणण्याकरिता गेली होती. त्याठिकाणी ती एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पिडीत मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटून पळ काढला व घरी जाऊन घडलेली आपबिती तिच्या काकूकडे कथन केली. त्यानंतर लगेच मालेगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी पिडितेने फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपीवर भादंविचे कलम कलम ३५४, सह कलम १२, पोस्को सहकलम अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधात्मक कायदा ३ (१) (डब्ल्यू) आदीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गावात धडक देऊन आरोपीचा शोध घेतला असता, तो कुठेही आढळून आला नाही. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रामेश्वर अव्हाळे करत आहेत.