६ टक्के रुग्ण १६ वर्षांखालील; पण लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:43 AM2021-04-20T04:43:01+5:302021-04-20T04:43:01+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात बालकांनादेखील ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात बालकांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. जिल्ह्यात १६ वर्षांआतील जवळपास १३०० बालकांना संसर्ग झाला आहे. परंतु, बालकांसाठी अद्याप लस नसल्याने देता येत नाही.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आला होता. आता पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला. एप्रिल महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. १६ वर्षांआतील बालकांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. परंतु, १८ वर्षांखालील बालकांसाठी अद्याप लस निघाली नाही. त्यामुळे देता येत नाही. ५२ टक्के रुग्ण हे ४५ वर्षांआतील आहेत. परंतु, वयाचे बंधन असल्याने या रुग्णांनादेखील लस देता येत नाही.
००००
४५ पेक्षा कमी वयाचे १२ हजार रुग्ण; पण लसीकरण सुरू नाही
जिल्ह्यात सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजारांच्या घरात आहे. पहिल्या लाटेत शक्यतोवर ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोना संसर्ग होत होता. दुसऱ्या लाटेत वयाचे बंधन नसून कुणालाही संसर्ग होत आहे. जिल्ह्यात जवळपास १२ हजार रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांना नियमानुसार लसीकरण सुरू आहे. त्यामुळे ४५ वर्षांआतील नागरिकांना लसीकरण करता येत नाही.
००००
मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत...
कोरोना प्रतिबंधक लस ही १८ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. अद्याप १८ वर्षांखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली नाही. जोपर्यंत मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविणे, मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. दुसऱ्या लाटेत १६ वर्षांआतील मुलांनादेखील संसर्ग होत असल्याने मुलांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे.
०००००
१६ वर्षांखालील १३५० रुग्ण; पण लसच उपलब्ध नाही
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. १ ते ५ वर्षे वयोगटातील जवळपास २५० बालकांना कोरोना संसर्ग झाला आहे तर ५ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ११०० बालके कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १६ वर्षांखालील मुलांचे प्रमाण ६ टक्के येते. मुलांसाठी लस उपलब्ध नाही. लस येईपर्यंत मुलांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.