वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:04 PM2017-11-08T14:04:20+5:302017-11-08T14:05:53+5:30
वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.
वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. या जलसाठ्यातून सुमारे ८ हजार १०० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असा आशावादही प्रशासनाने व्यक्त केला.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलस्त्रोतातील गाळ काढणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील जलपातळीत वाढ करणे यासह जलसंधारणाची विविध कामे केली जातात. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सदर अभियान सुरू झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत एकूण ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांत ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली. २०० गावांमध्ये वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मंगरूळपीर २७, मानोरा ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड १७, मालेगाव २४, मंगरूळपीर ३१, मानोरा २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या गावांमध्ये २ हजार १२ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. सन २०१७-१८ वर्षात जलयुक्त शिवार अभियानात १२० गावे असून, ७ नोव्हेंबरपर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे विहित मुदतीच्या आत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत.