वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:13 PM2020-12-06T12:13:32+5:302020-12-06T12:18:16+5:30
Washim News ६३ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश लवकरच मोफत मिळणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या पात्र ६३ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश लवकरच मोफत मिळणार आहे. यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी ७० लाख ७० हजाराचा निधीही मिळाला आहे.
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून समग्र शिक्षा अभियानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश दिले जातात. यंदा कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकल्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे शासनाकडून जिल्ह्याला निधी मिळाला आहे. जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वितरण केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेला १.७० कोटींचा निधी मिळाला
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी जिल्हा परिषदेला एक कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. व्यवस्थापन समित्या गणवेश खरेदी करतील.
समग्र शिक्षा अभियानातून पात्र विद्यार्थ्यांना प्रती दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी शिक्षण विभागाला १.७० कोटींचा निधी प्राप्त झाला. हा निधी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शाळा व्यवस्थापन समितीला दिला जाइल. गणवेशाचे घरपोच वितरण केले जाणार आहे.
- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी