जिल्ह्यात ६४ हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:10+5:302021-08-28T04:46:10+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पार पडलेल्या आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राऊत यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण करावी. ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. पंचायत समिती निहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जल जीवन मिशन अंतर्गत ‘रेट्रो फिटिंग’ची कामे वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी दिल्या. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील बोरकर, स्वप्नील राठोड व डी.जी. होळकर उपस्थित होते.
.........................
२८५ गावांमध्ये होणार ‘रेट्रो फिटिंग’
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. चालू वर्षात ५ कोटी २८ लाख रुपये प्राप्त झाले असून प्रगतिपथावरील २३ योजनांसाठी २ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. २८५ गावांमध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून ६४ हजार १९७ कुटुंबांना नळजोडणी दिली जाणार आहे. त्यातून प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे साळुंके यांनी सांगितले.