जिल्ह्यातील ६६ प्रकल्प तहानलेलेच!
By Admin | Published: July 8, 2017 01:33 AM2017-07-08T01:33:26+5:302017-07-08T01:33:26+5:30
२० प्रकल्पांत १० टक्क्यांहून कमी जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या मृगात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे पिके संकटात असून, जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांपैकी ६६ प्रकल्प कोरडेच आहेत. त्याशिवाय २० प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर असून, या तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिली, तर संबंधित गावांत पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून एकूण १२५ प्रकल्प आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात सरारीपेक्षा खूप अधिक पाऊस पडल्यानंतरही यातील निम्म्याहून अधिक प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडे ठण्ण पडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये प्रामुख्याने रिसोड तालुक्याचा समावेश होता. या तालुक्यासह जिल्हाभरातील पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आता यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, जमिनीची धूपच त्यामुळे कमी झाली नसल्याने जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ६.२१ टक्के, कारंजा तालुक्यातील प्रकल्पांत २४.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांत ७.९४ टक्के, रिसोड तालुक्यातील प्रकल्पांत ११.६९ टक्के, तर मानोरा तालुक्यातील प्रकल्पांत १६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १८० मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १८६.६६, रिसोड तालुक्यात १७१.९२, मंगरुळपीर तालुक्यात १६६. ६६ मिमी, मानोरा तालुक्यात १७२.१८ मिमी, तर कारंजा तालुक्यात १७५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.