वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:22 AM2020-05-26T11:22:26+5:302020-05-26T11:22:45+5:30

आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

66,608 workers return home from Washim district | वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

Next

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने मुंबई, पुणे, नाशिक यासह परराज्यात स्थलांतरीत झालेल्या मजूरांनी मुलाबाळांसह शेकडो किलोमिटरचा पायदळ प्रवास करून आपले गाव गाठले. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवार, २५ मे पर्यंत ६६ हजार ६०८ मजूरांची घरवापसी झाली. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांनी ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण केला; तर इतर १६ हजार १९५ मजूर अद्याप ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आधीच २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने गत काही महिन्यांमध्ये जगभरात थैमान घातले. त्याची झळ महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात बसली. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने तातडीची पाऊले उचलत २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आल्याने परराज्य व अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या शेकडो मजूरांनी कोरोनाच्या भितीपोटी पायदळ प्रवासाचा मार्ग स्विकारून शेकडो किलोमिटरचा पल्ला गाठला व गाव जवळ केले. प्राप्त माहितीनुसार, ‘लॉकडाऊन’च्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले. तसेच २४ मार्च ते २५ मे २०२० या ‘लॉकडाऊन’च्या दोन महिन्याच्या कालावधीत ३५ हजार ६०८ मजूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला.


मागेल त्याला काम देण्याची प्रशासनाची तयारी

वाशिम जिल्ह्यात २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूरीचे काम देण्याची तयारी दर्शविली असून सद्य:स्थितीत ४९१ पैकी २४१ ग्रामपंचायतींमध्ये ७०४ कामे सुरू देखील करण्यात आली आहेत. यामाध्यमातून ४ हजार ११३ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.

रोजगार हवा तर करावी लागणार अंगमेहनतीची कामे
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांमधून मजूर, कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्यातील अनेकजण कंपन्यांमध्ये कामाला होते. रोजगार हमी योजनेची कामे मात्र पूर्णत: अंगमेहनतीची असून रोजगार हवा तर त्याची तयारी या मजूर, कामगारांना ठेवावी लागेन, अशी स्थिती आहे.


जिल्ह्यात आधीच नोंदणीकृत जॉबकार्डधारक २ लाख २० हजार आणि परगावहून आपापल्या गावी परतलेल्या प्रत्येक मजूर, कामगारास रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी आहे. त्यानुषंगाने तहसीलदार, मंडळ अधिकारी, रोजगार सेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षणही केले जात आहे. रोजगारापासून कुणीही वंचित राहणार नाही.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

Web Title: 66,608 workers return home from Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.