सुकांडा येथे १२ दिवसांत ६८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:39+5:302021-05-09T04:42:39+5:30
१३१३ लोकसंख्या असलेल्या सुकांडा गावात आजवर आरोग्य विभागाच्या वतीने केवळ ५८ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्यसेवक अंनिस ...
१३१३ लोकसंख्या असलेल्या सुकांडा गावात आजवर आरोग्य विभागाच्या वतीने केवळ ५८ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्यसेवक अंनिस कुरेशी यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २७ एप्रिल रोजी पहिला बाधित रुग्ण निघाला. त्यानंतरच्या कालावधीत एकेरी संख्येवरील बाधितांचा आकडा गेल्या तीन दिवसांत दुहेरी झाला आहे. ८ मे या एकाच दिवशी गावात २५ जण कोरोनाबाधित निघाल्याने सध्या गावातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ६८ वर पोहोचली आहे. गत १२ दिवसांत कोरोनाने गावात थैमान घातल्याने गावातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे.
पंचायत समिती सदस्य जयसिंगराव घुगे यांच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने गावात कोरोना चाचणीला वेग देण्यात आला. गत चार दिवसांत गावात ३४२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ८ मे पर्यंत २२२ जणांचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून एकूण ६४ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तर ८ मे रोजी चाचणी केलेल्या १२० जणांचा चाचणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे. यामध्येसुद्धा बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुकांडा येथील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजुरा आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्यसेवक अंनिस कुरेशी, आरोग्यसेविका आर. आर. धादु, कंत्राटी आरोग्यसेविका रेखा भोंबळे, आशा स्वयंसेविका शशिकला अवचार, सुनिता आंधळे हे चोख सेवा देत आहेत.