एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:21 PM2018-09-19T16:21:19+5:302018-09-19T16:21:28+5:30
पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : कृषि आणि महसूल विभागाच्या योजना गावपातळीवर राबविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत. विशेषत: नैसर्गिक आपत्तीने होणाºया नुकसानाचे पंचनामे करणे, अहवाल सादर करण्यास यामुळे विलंब लागत असल्याचे दिसून येत आहे.
पिकांवरील कीडरोगाचे नियंत्रण, अतिवृष्टी, गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे सर्वेक्षण करणे, पंचनामे करून प्राथमिक व अंतीम अहवाल तयार करण्याची कामे गावपातळीवर कृषि सहायकांनाच करावी लागतात. असे असताना बहुतांश गावांमधील कृषि सहायकाचे पद रिक्त आहे. परिणामी, कृषि विभागांतर्गत सोपविण्यात येणाºया विविध कामांना न्याय देवून महसूल विभागाकडील कामे करताना कार्यरत कृषि सहायकांवर अतिरिक्त ताण येत असल्याने ते त्रस्त झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात ७९१ महसूली गावे असून किमान तेवढेच कृषि सहायक असणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्याच धोरणांनुसार ३ ते ४ गावे मिळून कृषि सहायकाच्या एका पदास मंजूरी देण्यात आलेला आहे. त्यातही सद्य:स्थितीत मंजूर असलेली अनेक ठिकाणची पदे रिक्त असल्याने एका कृषि सहायकास ७ ते ८ गावांमधील कामांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. यामुळे कामे प्रभावित होत असून महत्वाचे अहवाल कृषि विभाग व महसूल प्रशासनाकडे सादर करतानाही मोठी दमछाक होत असल्याने कृषि सहायक त्रस्त झाले आहेत. नजिकच्या अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्येही कृषि सहायकांसंदर्भात अशीच स्थिती उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गावपातळीवर कीड रोग सर्वेक्षण, अतिवृष्टी-पुरामुळे होणाºया शेतपिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण, पंचनामे करणे, अहवाल तयार करण्याची कामे कृषि सहायकांनाच करावी लागतात. त्यामुळे नियमानुसार कृषि सहायक कार्यरत असणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने कृषि सहायकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे सलग पाठपुरावा सुरू आहे.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वाशिम