रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी सात कोटींचा निधी!
By admin | Published: October 15, 2016 02:36 AM2016-10-15T02:36:38+5:302016-10-15T02:36:38+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाकडे एकूण ५५ कामे प्रस्तावित, एकाही कामाला सुरुवात नाही.
वाशिम, दि. १४- ग्रामीण भागातील नादुरूस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पाच कोटी ९१ लाख २६ हजार रुपयांची तरतूद केली असून, आतापर्यंंंंंत २.७४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणेद्वारे निधीची तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फेदेखील रस्ते व पुलांची सुविधा निर्माण केली जाते. यासाठी सेस फंड, जिल्हा परिषदेचा निधी, जिल्हा नियोजन विकास समिती व विविध योजनेंतर्गतचा शासन निधी अशी कोट्यवधी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव केली जाते. रस्ते व पूल निर्मितीनंतर अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण होते तसेच पुलालादेखील तडे जातात. नादुरूस्त रस्ते व पुलामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते व पुलाच्या दुरूस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध निधीतून या प्रस्तावांना मंजुरात दिली जाते. सन २0१५-१६ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ह्यरस्ते व पुलांचा परीरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम-गट बह्ण या शीर्षकाखाली रस्ते व पूल दुरूस्तीच्या ४५ प्रस्तावांना मंजुरात दिली असून, यासाठी पाच कोटी २१ लाख ३६ हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. तसेच ह्यरस्ते व पुलांचा परीरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम-गट कह्ण या शीर्षाखाली १0 प्रस्तावांना मंजुरात दिली असून, यासाठी ६९ लाख ९0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद आहे. या दोन्ही कार्यक्रमांतर्गत दोन कोटी ७४ लाख ३३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पावसाळा असल्याने एकाही कामाला सुरूवात होऊ शकली नाही, असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात या कामांना सुरूवात होईल, असे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. सदर कामे ग्रामपंचायत, सुशिक्षित बेरोजगार संस्था, मजूर संस्था, कंत्राटदार आदींमार्फत केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता एन.डी. शिंदे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन कामे प्रस्तावित
दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थानांची कामे प्रस्तावित असून, यासाठी सहा कोटी ७४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीची तरतूद आहे. यापैकी एका कामाला सुरूवात झाली असून, उर्वरित काम अद्याप सुरू झाले नाही.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी बांधकाम विभागातर्फे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील नादुरूस्त रस्ते व पुलांची दुरूस्ती करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. उपलब्ध निधीनुसार कामे होणार असून, मुदतीच्या आत कामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
- चंद्रकांत ठाकरे
उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती, जिल्हा परिषद वाशिम.
नादुरूस्त रस्ते व पुलाच्या दुरूस्तीची एकूण ५५ कामे प्रस्तावित आहेत. या कामांना लवकरच सुरूवात होणार असून, कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च २0१७ अशी आहे. या कालावधीत संबंधिताना कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मुदतीत कामे न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- एन.डी. शिंदे
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद वाशिम.