पोहरादेवी संस्थानसाठी सात कोटी!
By Admin | Published: December 2, 2015 02:36 AM2015-12-02T02:36:21+5:302015-12-02T02:36:21+5:30
पोहरादेवी संस्थान विकाससाठी निधी.
वाशिम : मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून देशभर ख्यातीप्राप्त असलेल्या पोहरादेवी संस्थानच्या विकासासाठी सात कोटींच्या निधीला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी १ डिसेंबरला मान्यता दिल्याची माहिती आहे. या वृत्ताला आमदार राजेंद्र पाटणी यांनी दुजोरा दिला. पोहरादेवी संस्थानवर देशभरातून बंजारा समाजबांधव मोठय़ा संख्येने नतमस्तक होण्यासाठी येतात; मात्र येथे पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. या संस्थानच्या सर्वांंंगीण विकासासाठी यापूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला होता, तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांनी वित्तमंत्री मुनगुंटीवार यांच्यासोबत चर्चा केली होती. त्या अनुषंगाने १ डिसेंबरला मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पोहरादेवी संस्थानचा विकास आराखडा मांडण्यात आला. भक्तनिवास व अन्य सुविधांसाठी सात कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. वित्तमंत्र्यांनी या निधीला मान्यता दिल्याने पोहरादेवी संस्थानच्या विकासातील मोठा अडथळा दूर झाला.