कोरोना काळात ७० मुली बेपत्ता, ५९ घरी परतल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:34+5:302021-02-25T04:56:34+5:30
ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम ...
ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात २०२० मधील कोरोना काळात ७० मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. यासंदर्भात त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावले उचलत तपासकार्य हाती घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सांगण्यावरून तथा मोबाइलवरील लोकेशनसह इतर स्वरूपातील सुगाव्यांवरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांचे पथक पाठवून ७० पैकी ५९ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलीस दलाला यश मिळाले आहे; परंतु ११ मुली अद्याप बेपत्ता असून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात आहे.
वयात आलेला मुलगा किंवा मुलगी घर सोडून जाण्याच्या कारणांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता, मुलांचा आई-वडिलांशी कमी होत चाललेला संवाद, मित्र-मैत्रिणींसोबत अधिक काळ घालवण्याची मुभा आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळेच असे प्रकार घडत असल्याचे तपासादरम्यान आढळत असल्याचे ते म्हणाले.
.........................
कोणत्या महिन्यात किती बेपत्ता
जानेवारी - १४
फेब्रुवारी - ११
मार्च - १०
एप्रिल - १
मे - ३
जून - ७
जुलै - ५
ऑगस्ट - ४
सप्टेंबर - ७
ऑक्टोबर - २
नोव्हेंबर - ४
डिसेंबर - २
.......................
कोणत्या वर्षांत किती?
२०१८- ४२
२०१९ - ५९
२०२० - ७०
....................
११ मुलींचा शोध लागेना
२०२० या वर्षभराच्या काळात ७० मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ११ मुलींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. अशातच १९ जानेवारी २०२० रोजी बेपत्ता झालेल्या वैष्णवी जाधव नामक मुलीचा तिच्याच जवळच्या नातेवाइकांनी हत्या करून प्रेत जाळून टाकल्याचे ८ महिन्यांनंतर उघडकीस आले. बेपत्ता असलेल्या मुलींसोबत अशाच प्रकारे काही झाले नसावे ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
......................
चार बेपत्ता मुलांचा लागला शोध
२०२० या वर्षांत मुलींसोबतच चार अल्पवयीन मुलेही बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत चारही मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल आणि जून या महिन्यांमध्ये ही मुले बेपत्ता झाली होती.
.................
कोट :
जिल्ह्यात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०२० या वर्षांत ७० मुली आणि ४ मुले बेपत्ता झाली होती. त्यातील ५९ मुली आणि चारही मुलांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनास यश मिळाले आहे. इतर बेपत्ता मुलींचाही लवकरच शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात निश्चितपणे यश मिळेल अशी खात्री आहे.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम