शुल्क परताव्याचे ७0 लाख होणार खात्यात जमा!
By Admin | Published: May 9, 2017 02:13 AM2017-05-09T02:13:58+5:302017-05-09T02:13:58+5:30
संस्थाचालकांच्या आंदोलनाचे फलित : सीईओंशी सकारात्मक चर्चा
वाशिम : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार्या जिल्हय़ातील ४४ शाळांना सन २0१४-१५ पासून शुल्क परतावा मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित संस्थाचालकांनी सोमवार, ८ मे रोजी जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन २0१४-१५ चे ७0 लाख रुपये विनाविलंब संस्थाचालकांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन मिळाल्याने या प्रश्नावर काहीअंशी तोडगा निघाला.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणार्या जिल्ह्यातील ४४ शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ही रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संस्थाचालकांनी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
यादरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य ज्योती गणेशपुरे यांनी मध्यस्थी करत मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी २0१४-१५ च्या शुल्क परताव्याची ७0 लाख रुपये रक्कम विनाविलंब संस्थाचालकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अवलंबिण्याचे निर्देश पाटील यांनी दिल्यामुळे संस्थाचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.