७० टक्के पेरणी पूर्ण!
By admin | Published: July 1, 2017 01:05 AM2017-07-01T01:05:47+5:302017-07-01T01:05:47+5:30
सोयाबीनची सर्वाधिक पेरणी : सर्वात कमी कपाशीची लागवड!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जून महिन्यात सातत्यपूर्ण, समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाची ७० टक्के पेरणी आटोपली आहे. अपेक्षित उत्पादनासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला; मात्र त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. २८ जूनपर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. यावर्षी कृषी विभागाने एकूण चार लाख नऊ हजार ६३ हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. २८ जूनपर्यंत ८६ हजार ६९१ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७० अशी आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची दोन लाख २५३ हेक्टरवर झाली तर सर्वात कमी लागवड कपाशीची ९ हजार ३३१ हेक्टरवर झाली आहे. मुगाची पेरणी ११ हजार ४३९ हेक्टर, उडीद १५ हजार ३६९ हेक्टर, तूर ४४ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
वाशिम तालुक्यात ८३ हजार २६० पैकी ५८ हजार ५३४ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७०.३० अशी येते. मानोरा तालुक्यात ५५ हजार २०२ पैकी ३२ हजार ११४ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ५८.१७ अशी येते. रिसोड तालुक्यात ७६ हजार १०० पैकी ५९ हजार १८१ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ७७.७६ अशी येते. मंगरूळपीर तालुक्यात ५७ हजार ३९८ पैकी ५३ हजार ४४३ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ९३.१० अशी येते. मालेगाव तालुक्यात ६९ हजार ६३४ पैकी ५९ हजार ५४० हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ८५.५० अशी येते. कारंजा तालुक्यात ६७ हजार ४६९ पैकी २३ हजार ८७९ हेक्टरवर पेरणी झाली असून, याची टक्केवारी ३५.३९ अशी येते.