वाशिम जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी लाभार्थींना मिळणार धान्याऐवजी पैसे
By दिनेश पठाडे | Published: March 1, 2023 05:57 PM2023-03-01T17:57:05+5:302023-03-01T17:57:44+5:30
शेतकरी कुटुंबांना दिलासा: एपीएलचे १८२९९ कार्डधारक
दिनेश पठाडे, वाशिम: राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण केली करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारी रोजी घेतला आहे. त्यात वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश असून जिल्ह्यातील १८ हजार २९९ कार्डवरील ७० हजार २५२ लाभार्थींना धान्यऐवजी पैसे मिळणार असून प्रती लाभार्थी १५० रुपये त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. जानेवारी २०२३ पासून लाभ दिला जाणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए योजनेंतर्गत गहू २२ रुपये प्रती किलो व तांदुळ २३ रुपये प्रती किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे २०२२ आणि १ सप्टेंबर २०२२ रोजी पत्राद्वारे कळवले होते. ही बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
या योजनेचा हजारो लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सर्व तालुका पुरवठा विभागांना १ मार्च रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत.
एपीएल शेतकरी योजना तालुकानिहाय लाभार्थी
तालुका--कार्ड संख्या--लाभार्थी संख्या
वाशिम -३२२०--१३४२४
मालेगाव--२७९४--१०१२०
रिसोड--२०९४--७५६९
मंगरुळपीर--५१३७-१८४१६
कारंजा--३८०२--१६२१३
मानोरा--१२५२--४५१०
लाभार्थींना करावा लागणार अर्ज
रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता आरसीएमएस वर नोंद असलेल्या संबंधित पात्र शिधापत्रिकारधारकांना डीबीटी साठी आवश्यक असलेला बँक खात्यांचा तपशिलासह ऑफलाइन अथवा ऑनलाइन अर्ज पुरवठा विभागाकडून करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन आधार लिंक असलेल्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे.