७० वर्षीय ‘प्यारेलाल’ यांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:43+5:302021-08-19T04:44:43+5:30
वाशिम : नोकरीच्या धावपळीतून फावला वेळ काढत कारंजा शहरातील ७० वर्षीय प्यारेलाल गुप्ता यांनी पुरातनकालीन वस्तू संग्रहाचा अनोखा छंद ...
वाशिम : नोकरीच्या धावपळीतून फावला वेळ काढत कारंजा शहरातील ७० वर्षीय प्यारेलाल गुप्ता यांनी पुरातनकालीन वस्तू संग्रहाचा अनोखा छंद जोपासला आहे. गत ४० वर्षांपासून हजारो विविध वस्तू एकत्र करून ते आपला छंद वेगळ्या पद्धतीने जोपासत आहेत.
गुप्ता यांनी एसटी महामंडळात ३० वर्ष कनिष्ठ सहायक पदावर नोकरी केली आणि सेवानिवृत्त झाले. याच दरम्यान अकोला येथे नोकरी करीत असताना त्यांना पुरातन वस्तूचा संग्रह करण्याचा छंद लागला. यामध्ये प्यारेलाल यांनी धातूच्या विविध मूर्ती, नाणी, गृहोपयोगी वस्तू, दिवे, ढाल, अजबगजब वस्तू, पाळीव प्राण्याचे सजावट साहित्य, वजन मापे यासह अन्य पुरातन वस्तूंचा समावेश आहे.
नोकरीवर असताना त्यांची एका भंगारच्या दुकानवर नजर गेली. एक धातूची सुबक मूर्ती तुटताना पाहिली आणि ती विकत घेतली. तेथून हा छंद सुरू झाला, असे ते अभिमानाने सांगतात. आज हजारो वस्तूंच्या स्वरुपात हा छंद पोहचला आहे. याकरिता त्यांनी अनेकवेळा उपाशी राहून वस्तू विकत आणल्या. ३० वर्षांपूर्वी दोन लाख खर्च केला. लोकांसाठी काही करता येईल का आणि इतिहास जोपासला जाईल या प्रयत्नातून हा छंद सुरू केला, असेही प्यारेलाल सांगतात.
००००००००००००००
कुटुंबीयांच्या रोषालाही जावे लागले सामोरे
या छंदामुळे अनेक वेळा परिवारातील लोकांना त्रास सहन करावा लागला. काही वेळा कुटुंबीयांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. मात्र परिवाराची समजूत काढून प्यारेलाल यांनी छंद सुरू ठेवला. त्या वेळी झालेला त्रास आज परिवाराच्या लोकांना वेगळा गर्व आणि आनंद देऊन जात आहे. घरच्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या मित्रांना हा अनमोल ठेवा पाहण्याचा वेगळा आनंद देऊन जाते.
०००००
इतिहासप्रेमींसाठी पर्वणी
ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून कारंजा शहराचा उल्लेख केला जातो. आजही अनेक पुरातन वास्तू कारंजा शहरात आहेत. मात्र जिल्ह्यात पुरातन ठेवा जोपासणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्याइतपतही नाहीत. प्यारेलाल यांनी जोपासलेला ठेवा हा इतिहासप्रेमींसाठी पर्वणी ठरू शकते. मात्र त्याकरिता प्यारेलाल यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रशासन आणि शासन यांची मदत मिळाली तर मोठ्या संग्रहालयाची निर्मिती करणे अधिक सुलभ होईल.