वाशिम जिल्ह्यात ७.५० लाख नागरिकांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:54 PM2020-12-04T12:54:59+5:302020-12-04T12:55:08+5:30
Washim News : १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेंतर्गत १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे.
यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे साथरोगही उद्भवतात. कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका हा अतिजोखीम गटातील रुग्णांना आहे. या पार्श्वभूमीवर अतिजोखीम गटातील रुग्ण शोधणे आणि त्यांच्यावर वेळीच उपचार होणेही गरजेचे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात क्षयरुग्ण व सक्रिय कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वेळीच व नियमित उपचारामुळे क्षयरोग व कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. जिल्ह्यात सध्या १०९७ क्षयरुग्ण आहेत. या रुग्णांवर नियमित उपचार केले जात आहे.
सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत १६ डिसेंबरपर्यंत सात लाख ५० हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी एक आशा स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक हे दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण व तपासणी करणार आहेत. ग्रामीण भागात दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ घरांतील सदस्यांची तपासणी होणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णाची लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. क्षयरुग्ण संशयित असणाऱ्या रुग्णाचे दोन थुुंकी नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. अहवाल निगेटिव्ह आले, तर १६ डिसेंबरनंतर एक्स-रे काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. ‘एक्स-रे’च्या माध्यमातून निदान केले जाणार असून, सर्व रुग्णांना उपचाराखाली आणण्यासाठी ही मोहीम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.