आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:31 PM2020-02-07T15:31:57+5:302020-02-07T15:32:03+5:30
प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकांमधील कर्ज खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सद्या अंतीम टप्प्यात आहे. त्यानंतर विविध बँका आणि आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांची पडताळणी होणार असून त्यासाठी प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी गुरूवारी दिली.
सहकार विभागाच्या नियंत्रणाखाली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी केली जात असून या योजनेसाठी राष्ट्रीयीकृत,सहकारी आणि खासगी बँका निवडण्यात आल्या आहेत. १ फेब्रूवारी २०२० पासून स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करून त्याव्दारे संबंधित बँकांना शेतकºयांची माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात ही प्रक्रिया सद्या अंतीम टप्प्यात आहे. दरम्यान, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या बँकांना आपापल्या शाखा फलकावर आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या दर्शनी भागात लावाव्या लागणार आहेत.
यादरम्यान कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आधार क्रमांकाची बायोमेट्रीक पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. ही सुविधा आपले सरकार सेवा केंद्र आणि संबंधित सर्व बँकांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांना ७७८ बायोमेट्रीक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५०; तर इतरही बँकांमध्ये ही उपकरणे उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोडक यांनी दिली.