वाशिम जिल्ह्यात वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण करणारे ७८० मतदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:07 PM2019-04-03T16:07:54+5:302019-04-03T16:08:21+5:30
वाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या एकंदरित ९ लाख ४८ हजार ११० मतदारांपैकी ७८० मतदारांनी वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण केलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या एकंदरित ९ लाख ४८ हजार ११० मतदारांपैकी ७८० मतदारांनी वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण केलेली आहे. यासह तब्बल ८९ हजार ९७८ मतदार साठीपार असून ३० ते ३९ वयोगटात सर्वाधिक अर्थात २ लाख १६ हजार ३७१ मतदार आहेत. नव्याने नोंदणी झालेले १८ ते १९ वयोगटातील १८ हजार ४३८ नवमतदारांची भुमिका यंदा निर्णायक राहणार आहे.
येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी मतदार नोंदणी मोहिम युद्धस्तरावर राबविली. मतदानाचा टक्का वाढण्यासह नवमतदारांचा मतदान प्रक्रियेत प्रामुख्याने समावेश व्हावा, यासाठी देखील सर्वंकष प्रयत्न करण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जावर मतदान जागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात आला.
त्याची फलनिष्पत्ती होवून वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा १८ हजार ४३८ मतदारांची नव्याने भर पडली आहे. त्यात रिसोड विधानसभा मतदारसंघात ६ हजार १७७, वाशिम मतदारसंघात ६ हजार ७२२ आणि कारंजा मतदारसंघात ५ हजार ५३९ नवमतदारांचा समावेश आहे.
यासह २० ते २९ वर्षे वयोगटात १ लाख ९७ हजार ५९६ मतदार असून ३० ते ३९ वर्षे वयोगटात २ लाख १६ हजार ३७१, ४० ते ४९ वर्षे वयोगटात १ लाख ९३ हजार ८१८, ५० ते ५९ वर्षे वयोगटात १ लाख ४५ हजार ६३४, ६० ते ६९ वर्षे वयोगटात ८९ हजार ९७८, ७० ते ७९ वयोगटात ५२ हजार ६५६, ८० ते ८९ वर्षे वयोगटात २७ हजार ११४, ९० ते ९९ वर्षे वयोगटात ५ हजार २७५; तर १०० पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ७८० आहे.
या सर्व मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.
३० ते ३९ सर्वाधिक
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या३० ते ३९ वयोगटातील २ लाख १६ हजार ३७१ मतदार सर्वाधिक आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात ६९१७६, वाशिम ६९९२६ तर कारंजा मतदारसंघात ६७६३३ चा समावेश आहे.