वाशिम जिल्ह्याला नागरी सुविधांसाठी ८ कोटींचे विशेष अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:08 PM2018-10-10T18:08:23+5:302018-10-10T18:09:12+5:30
मानोरा तसेच मालेगाव नगर पंचायतीला प्रत्येकी ३ कोटी रुपये; तर वाशिम नगर परिषदेला ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाकडून मंजूर.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नव्याने तयार झालेल्या नगरपंचायतीस नागरी सुविधा पुरविण्यासाठी ‘विशेष अनुदान निधी’अंतर्गत मानोरा तसेच मालेगाव नगर पंचायतीला प्रत्येकी ३ कोटी रुपये; तर वाशिम नगर परिषदेला ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाकडून मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी बुधवारी दिली.
राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान तसेच नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य दिले जाते. नगर पंचायतींचा निधी ‘अर्थसंकल्प वितरण प्रणाली’वर वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासंबंधीचा शासन निर्णय राज्यपालांच्या स्वाक्षरीने पारित झाला आहे. त्यात वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला एकंदरित ८ कोटी रुपयांचा निधी आल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.