वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:28 PM2020-07-20T18:28:49+5:302020-07-20T18:28:56+5:30
आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २० जुलै रोजी आठ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे. दरम्यान, २० जुलै रोजी ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. मे महिन्याच्या अखेरीस परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांमुळे जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने द्विशतक ओलांडले. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचेदेखील स्वॅब घेण्याची व्यवस्था तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे. रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात कोण, कोण आले याची माहिती आरोग्य विभागातर्फे घेतली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाºया ३६ व्यक्तींना उपचारानंतर सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.