दहापैकी ८ जणांना बायकाेचाही माेबाइल नंबर पाठ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:10+5:302021-07-10T04:28:10+5:30
वाशिम : पूर्वी अनेकांचे फाेन नंबर पाठ राहायचे, माेबाइल आल्यापासून एकदा नंबर सेव्ह करून ठेवला की, त्याकडे ...
वाशिम : पूर्वी अनेकांचे फाेन नंबर पाठ राहायचे, माेबाइल आल्यापासून एकदा नंबर सेव्ह करून ठेवला की, त्याकडे पुन्हा पाहायचे नाही, या वृत्तीमुळे घरातील व्यक्तिंचेही माेबाइल नंबर पाठ नसल्याचे ‘लाेकमत’ने शहरातील काही भागांत नागरिकांना विचारणा केली असता दिसून आले. १० पैकी ८ व्यक्तिंना आपल्या बायकाेचा नंबरही माहिती नाही, हे विशेष.
माेबाइलमध्ये नंबर सेव्ह केल्याने व केव्हाही काम पडल्यास सदर व्यक्तीचे नाव सर्च केल्यानंतर समाेरील व्यक्तीचे माेबाइल नंबरसह इतरही माहिती राहत असल्याने हे घडत असल्याचे दिसून येत आहे. घरातील एकाही व्यक्तीचा नंबर पाठ नसल्याचे दिसून आले असले, तरी अनेकांना मात्र स्वत:च्या मालकाचा, बाॅसचा व मित्रांचा नंबर मात्र पाठ असल्याचे दिसून आले. लहान बालकांना मात्र आपल्या आईवडिलांचा माेबाइल नंबर पाठ असल्याचे यावेळी दिसून आले.
---------------
बायकाेचा नाही, पण मित्र, बाॅसचा नंबर पाठ
पाटीलनगर परिसरात एका व्यक्तीला बायकाेचा माेबाइल नंबर माहीत नाही, परंतु मित्राचा माेबाइल पाठ दिसून आला.
याच भागात एका व्यक्तीस घरातील आई-वडिलांचा नंबर पाठ हाेता, परंतु बायकाेचा नंबर पाठ नसून ‘हाेम’ या नावाने माेबाइलमध्ये सेव्ह हाेता.
समर्थनगरातील एका व्यक्तीने माेबाइल गॅलरीत नंबर सेव्ह आहेत, असे सांगितले.
-----------
तरुणापासून वृद्धांपर्यंत सर्व सारखेच
‘लाेकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये तरुणासाेबत वृद्धांनाही काेणाचे माेबाइल नंबर पाठ नसल्याचे दिसून आले.
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
माेबाइल असल्यानंतर नंबर पाठ कशासाठी ठेवायचा. माेबाइलमध्ये पतीचा नंबर सेव्ह आहे. प्रत्येक वेळी नंबर डायल करून फाेन लावणे कठीण जाते, म्हणून पाठ केला नसल्याचे पाटीलनगरातील महिलेने सांगितले.
माझ्या पतीचा नंबर पाठ असल्याचे समर्थनगरातील महिलेने सांगून नंबर सांगण्यास सुरुवात केली. मात्र, नंबर सांगता आला नाही. यावरून महिलांनाही आपल्या पतीदेवांचे माेबाइल नंबर पाठ नसल्याचे दिसून आले.
------------
पाेरांना आठवते माेठ्यांना का नाही
लहान मुलांची स्मरणशक्ती दांगडी असते. त्यांना नवीन काही करण्याची व जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. यामुळे माेठ्यांपेक्षा लहान मुले लवकर काेणतीही गाेष्ट अवलंबितात.
-डाॅ. नरेश इंगळे, मानसाेपचार तज्ज्ञ, वाशिम
-----
शाळेत जाताना मम्मी, पप्पा नेहमी माेबाइल नंबर पाठ करण्याचे सांगतात, तसेच माझ्या शाळेच्या आय कार्डवरही पप्पाचा नंबर असल्याने मला दाेघांचेही नंबर पाठ आहे.
- अथर्व खानझाेडे, वाशिम
पप्पांना विचारायला अनेक जण घरी येतात. पप्पा घरी नसल्यास त्यांचा माेबाइल नंबर माहीत आहे का, विचारणा करतात, म्हणून मला पप्पाचा नंबर पाठ आहे.
- गाेपाल, वाशिम