वाशिम येथे ८ हजार महिला व मुली एकत्र येऊन साकारणार ‘बेटी बचाओ’ अभियानाचा लोगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:45 PM2018-03-06T13:45:38+5:302018-03-06T13:45:38+5:30
वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत.
वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. या उपक्रमाचा सराव स्थानिक पोलीस कवायत मैदान येथे केला जात असून, ६ मार्च रोजी प्राथमिक टप्प्यात ‘लोगो’ साकारण्यात आला.
स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत दूर करणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासह महिला सक्षमीकरणासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानात वाशिम जिल्ह्यात समावेश असून, महिला व बालकल्याण विभागाद्वारे विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असून, या दिनाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो ८ मार्चला सकाळी ७ वाजता शहरातील पोलीस कवायत मैदान येथे साकारला जाणार आहे. यामध्ये किमान ८,३१८ महिला व मुलींचा सहभाग राहणार आहे. हा उपक्रम साकारण्यासाठी पोलीस कवायत मैदान येथे दररोज सकाळच्या सुमारास सराव केला जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, महिला व बालविकास अधिकारी राठोड, प्रभारी महिला व बालकल्याण अधिकारी प्रमोद कापडे यांच्या मार्गदर्शनात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे जिल्हा समन्वयक रुपेश निमके व चमू हा लोगो साकारण्यासाठी परिश्रम घेत आहेत. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत लोगो साकारण्याचा सराव करण्यात आला.