पीक नुकसानापोटी मिळाला ८१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:29 PM2020-09-16T13:29:17+5:302020-09-16T13:29:33+5:30
हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये मानोरा आणि वाशिम तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी १४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून, बाधित शेतकऱ्यांना त्याचे वितरण लवकरच केले जाणार आहे.
जिल्ह्यात डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी पिकांना मोठा फटका बसला. शासन निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने या पीक नुकसानाचे पंचनामे केले. त्यात मानोरा तालुक्यात तब्बल ५६७.२५ हेक्टर क्षेत्रावर, तर वाशिम तालुक्यात ३३.१० हेक्टर मिळून एकूण ६००.३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाने जिल्हास्तरावर अहवाल सादर केला. अहवालाच्या आधारे बाधित शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विभागीयस्तरावर निधीची मागणी नोंदविली. या मागणीनुसार शासनाने बाधित शेतकºयांना आर्थिक मदत वितरीत करण्यासाठी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यत मानोरा तालुक्यासाठी ७६ लाख ५३ हजार १५० रुपये, तर वाशिम तालुक्यातील बाधित शेतकºयांसाठी ४ लाख ४६ हजार ८५० रुपयांच्या निधीचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून १४ सप्टेंबर रोजी हा निधी वाशिम आणि मानोरा तहसीलकडे वर्ग करण्यात आला असून, बाधित शेतकºयांना लवकरच त्याचे वितरण केले जाणार आहे.
सप्टेंबरमधील पीक नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर
जिल्ह्यात डिसेंबर २०१९ पासून अवकाळी, पाऊस, गारपिट आणि अतिवृष्टीचा फटका पिकांना बसून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान झालेल्या पीक नुकसानापोटी बाधित शेतकºयांना मदतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यातनंतरच्या पीक नुकसानाचे पंचनामेही पूर्ण झाले असून, शासनस्तरावर बाधित शेतकºयांना मदतीसाठी निधीची मागणीही नोंदविण्यात आली आहे. आता सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.