मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 06:17 PM2018-09-04T18:17:29+5:302018-09-04T18:17:58+5:30
नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : झाडांमुळे विकासकामांना बाधा पोहचत असल्याचा मुद्दा पुढे करून स्थानिक नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. यामुळे मात्र वृक्षप्रेमी नागरिकांमधून पालिका प्रशासनाच्या धोरणाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.
वृक्षांचे घटते प्रमाण पर्यावरणाचा ºहास होण्यास कारणीभूत ठरत असल्याने शासनस्तरावरून एकीकडे वृक्ष लावा-वृक्ष जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अशा विविध स्वरूपातील घोषणा देवून वृक्षलागवडीला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे मात्र झाडेच विकासकामांच्या आड येत असल्याचे ठोसपणे सांगत स्थानिक प्रशासनाकडून शासनाच्या संकल्पनेला सुरूंग लावण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक ते अकोला नाका आणि तेथून पुढे एका खासगी दवाखान्यापर्यंत मोठमोठी हिरवीकंच झाडे वाढलेली आहेत. मात्र, ती मुळासकट तोडून घेवून जाण्यासंदर्भात नगर परिषदेने निविदा मागविल्या असून त्या १० सप्टेंबर रोजी उघडून त्यानंतर पात्र कंत्राटदारास झाडे तोडण्याची मंजूरी दिली जाणार आहे. एकूणच या सर्व प्रकारांमुळे मात्र वाशिममधील वृक्षप्रेमी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
झाडे तोडल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करणे अशक्य आहे. असे असले तरी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मधोमध विविध प्रजातींची, फुलांची झाडे लावण्यासाठी नगर परिषद पुढाकार घेणार आहे. त्यामुळे या कामास नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- गणेश शेट्टे
मुख्याधिकारी, वाशिम नगर परिषद