८६ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:12 PM2017-08-12T15:12:36+5:302017-08-12T15:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु अपेक्षीत भाव मिळत नसल्याने तूर उत्पादक शेतकºयांत नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे सुरुवातीलाच राज्य शासनाने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत हमी भावाने शासकीय तूर खरेदी सुरू केली. या तूर खरेदीदरम्यान विविध अडचणी आल्यामुळे तरू मोजणीत खोळंबा होऊन अनेक शेतकºयांना टोकण देऊनही त्यांची तूर मोजणे ३१ मे पर्यंतच्या निर्धारित मुदतीत शक्य झाले नाही. अशाच टोकणधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ जुलै रोजी निर्णय जारी करून टोकणाधारक शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मोजून घेण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तूर मोजणी शिल्लक असलेल्या १४ हजार ५४२ टोकणाधारक शेतकºयांची तूर मोजून घेण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीरआणि कारंजा या सहाही केंद्रांवर ४ हजार ९५७ टोकणधारकांची ८६ हजार ३३३ क्विंटल तूर मोजण्यात आली आहे. आता उर्वरित १५ दिवसांत प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत शिल्लक असलेल्या ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजून घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे तूर मोजणीला आणखी वेग देण्याची गरज आहे.