वाशिम जिल्ह्यातील ८७ हजार लाभार्थींना सामाजिक अर्थसहाय्य योजनांमुळे मिळाला आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:02 PM2017-11-15T14:02:42+5:302017-11-15T14:11:07+5:30
वाशिम: समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांसाठी शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत असून याअंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ३७० लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आल्याने निराधार, गरीब लाभार्थ्यांना जगण्यासाठी आधार मिळत आहे.
वाशिम: समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांसाठी शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत असून याअंतर्गत जिल्ह्यातील ८७ हजार ३७० लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आल्याने निराधार, गरीब लाभार्थ्यांना जगण्यासाठी आधार मिळत आहे.
राज्य आणि केंद्रशासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत सामाजिक अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन आदी प्रमुख सहा योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बहुतांश निराधार, विधवा, दिव्यांग, वृद्ध अशा समाजघटकांना समाविष्ट करुन लाभ दिला जात आहे.
वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १८ हजार ५९१ लाभार्थ्यांना; तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ४४ हजार ४२२ लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन अदा करण्यात येते. तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २३ हजार ९०२ लाभार्थींनी अनुदान दिले जात आहे. आर्थिक अनुदानाची रक्कम दरमहा या लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केली जात आहे. एखाद्या गरीब कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सदर कुटुंबाला एकरक्कमी २० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात असल्याची माहिती प्रशासनाने कळविली आहे.