पश्चिम वऱ्हाडात वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:54 PM2018-09-28T13:54:43+5:302018-09-28T13:55:26+5:30
वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. कमी पाऊस झाल्याने पश्चिम वऱ्हाडात पाणीटंचाईची समस्या जाणवण्याची भिती वर्तविली जात आहे.
पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात गत काही वर्षांत पावसाची सरासरी ही कमीच राहिली आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर जुलैच्या मध्यंतरापर्यंत अधूनमधून चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे यंदा या तिन्ही जिल्ह्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली; परंतु जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाने खंड दिला, तर आॅगस्टच्या मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी दिसू लागले. परतीच्या पावसाने पश्चिम वºहाडात हजेरी लावल्यानंतर अकोला जिल्ह्यात पावसाने कशीबशी वार्षिक सरासरी गाठली. या जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत १००.६२ टक्के पाऊस पडला. तर वाशिम जिल्ह्यात ९६ टक्के पावसाची नोंद झाली; परंतु बुलडाणा जिल्ह्यात केवळ ६९.६९ टक्केच पावसाची नोंद झालेली आहे. या तिन्ही जिल्ह्यांची एकंदरीत सरासरी काढल्यास २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे.
आठ तालुक्यांची स्थिती गंभीर
पश्चिम वऱ्हाडात २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची सरासरी ८८ टक्के असली तरी, ८ तालुक्यात ७५ टक्केही पाऊस पडलेला नाही. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (६३. ८१) टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव (४९.६३), नांदुरा (५३.६२), शेगाव (६२.५४), देऊळगाव राजा (६३.८७), संग्रामपूर (६६.८५), चिखली (७०.११) आणि मोताळा (७३.०९) या तालुक्यांचा समावेश आहे. पावसाची सरासरी लक्षात घेता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात या आठही तालुक्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.