वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:34 PM2019-05-07T13:34:10+5:302019-05-07T13:34:59+5:30
वाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गं
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतींमध्ये कुठल्याही स्वरूपातील सुविधा नसल्याने कामकाज वारंवार प्रभावित होत असून कर्मचारी पुरते त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची कार्यालयांची स्थिती अत्यंत चिंताजनक असून एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार असणे, सरपंच-उपसरपंचांसह सदस्य कार्यालयात नियमित न येणे, अन्य कर्मचारीही गैरहजर असणे आदी कारणांमुळे गावपातळीवरील विकासकामांना खीळ बसत आहे. त्यातच ९७ ग्रामपंचायतींना स्वत:च्या हक्काची इमारतच नसून भाड्याच्या इमारतीत अथवा गावात कुठेतरी पर्यायी व्यवस्था करून थातूरमातूर स्वरूपात कार्यालये चालविली जात आहेत. त्यात प्रामुख्याने विजेची पुरेशी सुविधा नसणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, संगणकांना पुरेशा ताकदीने इंटरनेट स्पीड नसणे, आदी कारणांमुळे ही कार्यालये नसल्यातच जमा आहेत. परिणामी, जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे अनेक मुलभूत प्रश्न निकाली निघणे अवघड झाले आहे. अनेकांना तर आपल्या समस्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नेमक्या कुणाकडे मांडायच्या, याचाही पत्ता अद्यापपर्यंत लागलेला नाही. एकूणच उद्भवलेल्या या सर्व गंभीर स्थितीमुळे विकासकामांचा पुरता बट्याबोळ झाला आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयासाठी इमारती उपलब्ध करून देण्यासह ग्रामपंचायतींच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.