जिल्ह्यातील ९ हजार मजुरांना मिळाले गावातच काम; ग्रामीण भागात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु
By दिनेश पठाडे | Published: June 18, 2023 05:01 PM2023-06-18T17:01:23+5:302023-06-18T17:01:37+5:30
विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते.
वाशिम : उन्हाळ्यात कामाच्या शोधात मजुरांची होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातच काम सुरु करुन ९ हजारांना मजुरांना गावातच काम उपलब्ध करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना गावातच काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे सोबतच विविध विकासात्मक कामे मार्गी लागावीत, या हेतूने योजना राबविली जाते. यामुळे अकुशल लाभार्थ्यांना गावातच रोजगार मिळतो.
विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. बोगसगिरीला चाप बसावा, गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केले जात आहेत. सार्वजनिक कामावरील मजुरांच्या हजेरीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे, तसेच जॉबकार्डधारकांचे आधार लिंक करण्यात आले. यासह इतर उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ग्रामीण भागातील मजुरांना हवे ते काम योजनेंतर्गत उपलब्ध केले जाते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात कामाचा तुटवडा असतो. मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांना कामाच्या शोधात इतरत्र जावे लागते. त्यामुळे गावातच काम उपलब्ध करुन दिले जाते. यासाठी मजुरांना काम मागणी अर्ज करणे आवश्यक ठरते. मजुरांना काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु असून त्यावर ९ हजार ८६ मजूर काम हजर असल्याचे रविवारच्या ऑनलाइन मस्टरवरुन पहायला मिळाले.
२२९ ग्रामपंचायतीमध्ये विविध कामे
जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीपैकी २२९ ग्रामपंचायती अंतर्गत विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु आहेत. यामध्ये फळबाग लागवड, सिंचन विहीर, घरकूल, पाणंद रस्ता आदी कामांचा समावेश आहे.