राष्ट्रीय महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण - भावना गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:29 PM2021-08-17T12:29:16+5:302021-08-17T12:29:24+5:30
Bhavna Gavli's clarification on Highway Work : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही.
वाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झालेले असून येत्या काही महिन्यांत हा राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के पूर्ण होऊन जिल्ह्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे, असे खासदार भावना गवळी यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे १५ ऑगस्टला दुपारी शिवसेनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अमित झनक, किरणराव सरनाईक, जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक उपस्थित होते. खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही. लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता नेहमी सहकार्य केले आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ अकोला ते वारंगा या महामार्गाच्या चौपदरीकरणकरीता लागणारी जमीन संपादित करण्याकरीता आपण जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकरी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शंभर टक्के जमीन संपादित करून घेतल्यामुळेच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर सायखेडा (ता. वाशीम) येथील निर्माणाधीन पूल पडल्यानंतर रात्रीतून मलबा हटवून निकृष्ट काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या चुका राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास शिवसैनिकांनी आणून दिल्या, असेही गवळी यांनी सांगितले.