‘कामधेनू’साठी ९0 गावे दत्तक!
By admin | Published: March 20, 2017 03:05 AM2017-03-20T03:05:28+5:302017-03-20T03:05:28+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचा पुढाकार; पशुपालकांना होणार मार्गदर्शन.
वाशिम, दि. १९- पशुधन व दुग्धोत्पादन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील ९0 गावांत 'कामधेनू' दत्तक ग्राम योजना राबविली असून, २0१७-१८ मध्ये या योजनेत आणखी ३0 गावांची भर पडणार आहे.
शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात जनावरांच्या वाढत्या किमती, चार्याची टंचाई, पोषणावरील वाढता खर्च यामुळे पशुपालन कठीण होत असल्याचा दावा शेतकर्यांनी केला. या पृष्ठभूमीवर पशुवैद्यकीय सेवेच्या विस्ताराबरोबरच शासनाने पशुपालनासंदर्भातील अन्य समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न म्हणून कामधेनू दत्तक ग्राम योजना अंमलात आणली. वाशिम जिल्ह्यात गायी, म्हशी मिळून तीन लाखांच्या वर पशुधन आहे. निरोगी व सुदृढ पशुधन असण्याबरोबरच दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी या योजनेत ३0 गावांची निवड केली जाते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणार्या या योजनेंतर्गत गावपातळीवर विविध शिबिरांच्या माध्यमातून पशुपालकांना माहिती दिली जाते. यासाठी प्रति गाव दीड लाख रुपयांची आर्थिक तरतूदही या योजनेंतर्गत करण्यात आली. सन २0१४-१५ या वर्षात ३0 गावे, सन २0१५-१६ या वर्षात ३0 गावे आणि सन २0१६-१७ या वर्षात ३0 गावांची निवड झाली असून, सन २0१७-१८ या वर्षात ३0 गावांची निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या गावांतील पशुपालकांना जनावरांचे लसीकरण, जंतुनिर्मूलन, रक्तजल व रोगनमुने, जनावरांमधील वंध्यत्वाचे व्यवस्थापन, गोचिडांचे निर्मूलन, दुग्ध स्पर्धांचे आयोजन, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिक व सांसर्गिक रोगांची माहिती आदी विषयांचे ज्ञान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. दुधात असलेल्या व भाकड संकरित गायी, देशी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, वासरांची शेतकरीनिहाय गणना करणे, गणनेच्या वेळी दुधात असलेल्या गायींचे, म्हशींचे दूध उत्पादनाची नोंद श्रेणी १, श्रेणी २ संस्थेद्वारे घेण्यात येते. दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने दूध संकलन केंद्र व प्राथमिक सहकारी दुग्धसंस्था यांचा सक्रिय सहभाग घेण्याला प्राधान्य दिले जाते. वैरणीची टंचाई दूर करण्यासाठी पशुपालकांचे ह्यचारा वाचवा, पशुधन जगवाह्ण या संदेशाद्वारे दत्तक गावांमध्ये प्रबोधन केले जाते, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्यापुरे यांनी दिली.
निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रशिक्षण
जनावरांचे संगोपन उत्तम पद्धतीने होण्याच्या दृष्टीने व दूध उत्पादनात अधिक चांगली वाढ होण्यासाठी जनावरांना सकस व संतुलित आहार देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकर्यांकडे उपलब्ध असलेला निकृष्ट चारा सकस करण्यासाठी शिबिरात प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे निकृष्ट चारा सकस करण्यासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजनेत समाविष्ट असलेल्या गावांमधील पशुपालकांना मार्गदर्शन केले जाते.