कोरोना लसीकरणासाठी वाशिम जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:32 PM2021-01-07T12:32:30+5:302021-01-07T12:32:58+5:30
Corona Vaccine जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ (लस वाहक डब्बा) उपलब्ध करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ (लस वाहक डब्बा) उपलब्ध करण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसून येते.
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मे महिन्यापर्यंत लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे दीड महिन्यांपूर्वीच शासनाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर ५० वर्षांवरील व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लस उपलब्ध झाल्यानंतर तालुका स्तरावर आणि तेथून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरक्षित लस पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्हॅक्सिन व्हॅन, कोल्ड बॉक्स ८३, ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ ९४९ ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘व्हॅक्सिन कॅरिअर’द्वारे आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित लस पोहोचविण्यात येणार आहे. २५ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीत साखळी केंद्र सुसज्ज ठेवली आहेत.
कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात नियोजन करण्यात येत आहे. ९४९ ‘व्हॅक्सिन कॅरिअर’ निश्चित करण्यात आले आहेत.
डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम