९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला फुलविणार परसबाग!
By नंदकिशोर नारे | Published: August 10, 2023 03:23 PM2023-08-10T15:23:30+5:302023-08-10T15:23:50+5:30
८ ऑगस्टला वाशिम येथे महिलांना बहुस्तरीय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
वाशिम : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ९६ अन्न सुरक्षा गटाच्या महिला या बहुस्तरीय शेती पद्धतीचा म्हणजे मल्टी लेयर फार्मिंग करून परसबाग फुलविणार आहेत. त्याअनुषंगाने ८ ऑगस्टला वाशिम येथे महिलांना बहुस्तरीय शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
अध्यक्षस्थानी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात ९६ महिला अन्नसुरक्षा गटाची स्थापना करण्यात आली. संबंधित शेतकरी गटातील प्रतिनिधी महिला या प्रशिक्षणास उपस्थित होत्या.
डॉ. प्रशांत घावडे यांनी आत्माअंतर्गत अन्नसुरक्षा गटास विविध भाजीपाला व फळझाडे यांच्या लागवड पद्धती व वाणांचे गुणवैशिष्ट्ये बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अनिसा महाबळे , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा गटाच्या महिला प्रतिनिधी प्रशिक्षणाला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन इंगोले, विजय दुधे, रामेश्वर पाटील, संजय राऊत, आत्मा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महिलांवर विशेष जबाबदारी!
परिवाराच्या पोषणाची जबाबदारी महिलांवर असते. परिवारातील सदस्यांना सकस अन्न कसे मिळेल याकडे महिला सातत्याने लक्ष देतात. त्यामुळे विशेषतः महिलांनी अन्न सुरक्षा गटांमार्फत बहुस्तरीय शेती पद्धतीचा अवलंब करून परसबाग तयार करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला. बहुस्तरीय शेती पद्धतीचा म्हणजे मल्टी लेयर फार्मिंग करून परसबाग निर्मितीद्वारे ९६ अन्नसुरक्षा गटातील जवळपास ९६० ते १००० महिलांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात परसबाग बियाणे व फळझाडे रोपे किटचे वाटपसुद्धा करण्यात आले.