भाड्याच्या खोलीत चालतो ९७ ग्रामपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 03:58 PM2020-02-02T15:58:12+5:302020-02-02T15:58:49+5:30

४९१ ग्रामपंचायतींपैकी ९७ ग्रामपंचायतींना अद्यापपर्यंत स्वत:ची सुसज्ज इमारत मिळालेली नाही.

97 Gram Panchayats in Washim District has no own building | भाड्याच्या खोलीत चालतो ९७ ग्रामपंचायतींचा कारभार

भाड्याच्या खोलीत चालतो ९७ ग्रामपंचायतींचा कारभार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींपैकी ९७ ग्रामपंचायतींना अद्यापपर्यंत स्वत:ची सुसज्ज इमारत मिळालेली नाही. यामुळे सरपंच, सचिवांसह ग्रामपंचायत सदस्यांना भाड्याच्या खोल्यांमध्ये बसूनच कारभार करावा लागत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे माहेवारी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभा एकतर जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांमध्ये किंवा उघड्यावरच उरकाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, ९७ ग्राम पंचायतींना अद्यापपर्यंत स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. परिणामी, भाड्याच्या खोल्यांमध्ये अथवा गावात इतर कुठेतरी पर्यायी व्यवस्था करून थातूरमातूर स्वरूपात कारभार चालविला जात आहे. त्यातच प्रामुख्याने विजेची पुरेशी सुविधा नसणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, आॅनलाईन स्वरूपातील कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना मिळालेल्या संगणकांना पुरेशा क्षमतेने इंटरनेट स्पीड न मिळणे आदी कारणांमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज वारंवार प्रभावित होत आहे. त्याचा थेट परिणाम ग्रामविकासावर होत असून याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मानोरा तालुक्यातील १८, मालेगाव तालुक्यातील १७, रिसोड तालुक्यातील ८, वाशिम तालुक्यातील १३, मंगरूळपीर तालुक्यातील १५ आणि कारंजा तालुक्यातील २६ अशा एकंदरित ९७ ग्रामपंचायती स्वत:च्या सुसज्ज इमारतींविना असून बहुतांश ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामास अनेक वर्षे उलटल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

शंभरावर ग्रामपंचायतींच्या इमारती मोडकळीस
जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींना अद्यापपर्यंत स्वत:ची सुसज्ज इमारत मिळालेली नाही. यामुळे त्यांचा कारभार भाड्याच्या अथवा जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये सुरू आहे. दुसरीकडे शंभरावर ग्रामपंचायतींच्या इमारती जुन्या होऊन मोडकळीस आल्याने कारभार चालविताना सरपंच, सचिवांची दमछाक होत आहे.

जिल्हा परिषदेने गतवर्षी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जनसुविधा विकास योजनेंतर्गत ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. यासंदर्भात शासन निर्णयही पारित होऊन निधीची तरतूद झालेली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेन.
- चंद्रकांत ठाकरे
अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम

 

 

Web Title: 97 Gram Panchayats in Washim District has no own building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.