अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ९८२ महिला सन्मानित
By संदीप वानखेडे | Published: May 31, 2023 06:16 PM2023-05-31T18:16:49+5:302023-05-31T18:17:47+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संतोष वानखडे, वाशिम: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ९८२ महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गावातील २ महिलांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या निर्देशानुसार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात महिला व बालकल्याण विभागाने पूर्वनियोजन केले होते.
महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव संवेदनशिलता असणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभागी, बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये पुढाकार घेतलेल्या महिलांकडून ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात आले होते. दोन महिलांची निवड करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून ३१ मे रोजी जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण ९८२ महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रह्मा (ता.वाशिम) येथे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, वाशिमचे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनिता राजू कुटे व इंदुबाई संतोष मुसळे या दोन महिलांना पुरस्काराने सन्मानित केले.