अंगावर वीज पडल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
By नंदकिशोर नारे | Updated: October 6, 2022 13:28 IST2022-10-06T13:26:58+5:302022-10-06T13:28:27+5:30
घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

अंगावर वीज पडल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
वाशिम : आपल्या घरी भुलाबाई मांडून कोजागिरीपर्यंत सन साजरा करण्यासाठी बाजारामधून भुलाबाई घेऊन येत असताना १५ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. ज्योती महादेव बनसोडे (रा. सेलू रोड, वाशिम) असे मृत मुलीचे नाव असून तिचा भाऊ करण हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली.
भूलाबाईचा उत्सव साजरा करण्याचे ज्योती हिने स्वप्न रंगविले होते. त्यासाठी तिने शहरांमधून भुलाबाई खरेदी केली व लहान भाऊ करण याचे सोबत परत आपल्या घरी सायकलने जात होती. संध्याकाळच्या वेळी सगळीकडे विजेचा प्रंचंड कडकडाट सुरू होता. दरम्यान रेल्वे उड्डाण पुलावर चढाचा रस्ता असल्याने दोघे बहिण भाऊ सायकल हातात घेऊन पायी पुल चढत होते.
ज्योती हीचे जवळ सायकल होती तर करण हा सायकलच्या मागे भुलाबाई हातात घेऊन चालत होता. पुलावर पायी चालत असतानाच ज्योतीच्या अंगावर वीज पडली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा भाऊ करण हा काही अंतरावर असल्याने त्याला किरकोळ जखम झाली. ज्योती ही कळंबा येथील धानोरकर विद्यालयात दहावीत शिकत होती. तिचे वडील महादेव बनसोडे बस स्थानकवर असलेल्या हॉटेलवर मजुरीचे काम करतात. तिची आई भाजीपाला विकून कुटुंबाला आधार देते. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.