होळीपूर्वीच रंगांची उधळण; गर्द केशरीसह दुर्मिळ पिवळ्या फुलांनी बहरला पळस!
By सुनील काकडे | Published: February 25, 2024 05:23 PM2024-02-25T17:23:06+5:302024-02-25T17:23:33+5:30
औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ तथा बहुगुणी मानला जाणारा पिवळा पळसही फुलला आहे.
वाशिम : वसंत ऋतुला सुरूवात होताच रानावनातील झाडे निष्पर्ण होतात; मात्र याच काळात पळसाचे झाड गर्द केशरी रंगांनी फुलून जाते. ही झाडे बहरली की होळी, रंगपंचमीची चाहुल लागायला लागते. दरम्यान, वनोजा (ता.मंगरूळपीर) परिसरात केशरी फुलांसोबतच औषधी गुणधर्म असलेला दुर्मिळ तथा बहुगुणी मानल्या जाणारा पिवळा पळसही फुलला आहे. हे झाड ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात ठिकठिकाणचे पळस वृक्ष आकर्षक तथा मनोहारी फुलांनी फुलून जातात. कडक ऊन्हामुळे सर्व झाडांची पानगळ होवून जंगल परिसर ओसाड होतो. मात्र, रानावनात बहरणारी गर्द केशरी पळस फुले वसुंधरेचे सौंदर्य खुलवतात.
तथापि, केशरी पळसफुले साधारणत: सर्वत्र आढळतात, मात्र, पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो. औषधीसाठीही या फुलांचा उपयोग केला जात असल्याचे जाणकार सांगतात.
पळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फाॅरेस्ट’ची उपमा
पळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ अर्थात जंगलातील ज्वाला अशी उपमा इंग्रजांनी दिली होती. पळसाला झाडाला ठराविक आकार नसतो, तसेच त्याच्या फुलांना गंध देखील नसतो. मात्र, फुललेला पळस सर्वांनाच आकर्षिक करतो, हे विशेष.
पिवळा पळस पाहण्यासाठी गर्दी
आदर्श ग्राम वनोजा परिसरात समृद्धी महामार्गालगत पिवळा पळस बहरला आहे. बहुगूणी, दुर्मिळ अशी ही पळसाची पिवळी फुले पाहण्यासाठी निसर्ग प्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे.
पळसाच्या पिवळ्या फुलांचे झाड दुर्मिळ असून ते क्वचितच काही ठिकाणी आढळून येते. काटेपूर्णा अभयारण्यालगत वनोजा परिसरात असलेले हे पिवळ्या फुलांचे झाड आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. या झाडाच्या बिया गोळा करून काटेपूर्णा अभयारण्यात ठिकठिकाणी रोपन करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.
- पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा अभयारण्य