रिसोड येथे क्रिकेट सट्टाप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल
By नंदकिशोर नारे | Published: October 11, 2023 04:08 PM2023-10-11T16:08:15+5:302023-10-11T16:08:31+5:30
पाकिस्तान व श्रीलंका दरम्यान सामना सुरू असतांना सट्टेची देवाणघेवाण करत असलेल्या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिम : सद्यस्थितीत क्रिकेट विश्वचषकचे सामने सुरू असून यावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी होत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असलेले सट्ट्यावर पोलिसांनी लक्ष घातले असून अशीच एक कारवाई १० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रिसोड शहरातील लोणी फाट्यावर सट्टा सुरू असताना धाड टाकून करण्यात आली. यामध्ये १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाकिस्तान व श्रीलंका दरम्यान सामना सुरू असतांना सट्टेची देवाणघेवाण करत असलेल्या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार १० आक्टोबर रोजी रात्री गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी करत असलेल्या दोन इसमांना रिसोड ते लोणी मार्गावर वाहनासह पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल व टॅब असा एकूण २८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लाईव्ह सट्टेबाजी करत असलेल्या सागर जगदीश अग्रवाल ,प्रदीप सदार, सुभाष चोपडे, नितीन मोरे, ईश्वर उर्फ पिंट्या नंदकिशोर तोष्णीवाल सर्व रा. रिसोड यांचेसह इतर दहा आरोपी विरुद्ध मुंबई कायदा व जुगार प्रतिबंधक कायदा ॲक्ट १२ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यात इतर आरोपीचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सपोनि प्रशांत जाधव, पोहवा बावस्कर, मुसळे, मस्के यांनी केली.