गौरवास्पद! शेतकऱ्याची मुलगी ठरली जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर
By नंदकिशोर नारे | Published: April 6, 2023 12:46 PM2023-04-06T12:46:05+5:302023-04-06T12:46:28+5:30
तालुक्यातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती.
वाशिम : खरंतर संरक्षण क्षेत्रात महिलांचा टक्का कमी आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यातही मुलींसाठी हे क्षेत्र फारच अवघड असल्याचे समजले जाते. परंतु, या सर्व भ्रामक कल्पनेला फाटा देत काजळांबा (तालुका वाशिम) येथील मनीषा राजकुमार उगले, या २० वर्षीय तरुणीने पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीची अग्नीपरिक्षा उत्तीर्ण केली आणि ती जिल्ह्यातील पहिली महिला अग्निविर ठरली आहे.
तालुक्यातील काजळांबा येथील मनीषा राजकुमार उगले ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिचे वडील शेतकरी असून मनीषाला इतर मुलींपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण मोठे होऊन देश सेवेत जाण्याचा तिने निर्णय घेतला आणि अथक परिश्रम घेतले. मुंबई येथे तिने अग्निविरसाठी अर्ज केला. परीक्षा पास झाली. मैदानी चाचणी परीक्षेत यश संपादन केले. सर्व पात्रता पूर्ण करून ४ महिने प्रशिक्षण पूर्ण केले.
मनीषा ही शेतकरी कुटुंबातील आहे. हे उल्लेखनीय. ग्रामीण भागातील तरुणी आज देश सेवा करणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने सैनिक सेवेत यश संपादन करून मुलीही कुठेच मागे नाहीत, हे सिद्ध करून दाखविले. हा प्रत्येक मुलीचा सन्मान असून, माय बापाच्या कष्टाचे मोल तिने केले. तिचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.