मानाेरा तालुक्यातील भुली परिसरात विहिरीत पडला बिबट्या; वनविभागाने केली सुखरुप सुटका
By नंदकिशोर नारे | Published: April 27, 2024 04:16 PM2024-04-27T16:16:36+5:302024-04-27T16:17:27+5:30
रात्रीच्या वेळी बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असण्याची शक्यता कर्मचार्यांनी व्यक्त केली
नंदकिशाेर नारे, वाशिम: मानाेरा तालुक्यातील भुली येथील दिघोरी शिवार येथे सुमारे ६० ते ७० फूट खोल विहिरीत बिबट पडल्याचे २७ एप्रिल राेजी आढळून आले. या बिबटला पाहण्यासाठी माेठया प्रमाणात गर्दी झाली हाेती. वनविभागाने बिबटयाला सुखरुप काढले.
भुली येथील शंकर शेषराव चव्हाण २७ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या विहिरीतील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आले. पोलीस पाटील छाया डहाके यांनी मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी जे. व्ही.जाधव यांना विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती दिली. मानोरा वन परीक्षेत्र अधिकारी जे व्ही. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी यांनी सहकार्यांसह घटनेच्या ठिकाणी येऊन बिबट्या असल्याची खात्री केली. रात्रीच्या वेळी बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असण्याची शक्यता कर्मचार्यांनी व्यक्त केली.
वन विभागाचे कर्मचारी तसेच पुसद व वाशीम येथील रेसक्यू पथक यांनी विहिरीत दोरच्या साह्याने पिंजरा सोडून बिबट्याला जीवदान दिले. या मोहिमेसाठी कारंजा साहायक वन परीक्षेत्र अधिकारी ए. एस. शिंदे, मंगरूळपीर फिरते पथक प्रमुख सी. डी. चव्हाण, वन विभागाचे कर्मचारी एस पी. राठोड, ए. एम.वानखडे, व्ही. आर. शिंदे, एन. बी. सिरसाट, जी.ए.शिंदे, पी. के. बर्गे, एम. व्ही. गुहाडे, जी. जी. ठाकरे, एस व्ही. ठाकरे, पोलीस पाटील छाया डहाके आदींचे सहकार्य लाभले.