दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा

By सुनील काकडे | Published: April 14, 2023 10:35 PM2023-04-14T22:35:02+5:302023-04-14T22:35:38+5:30

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला

A mother with two little girls jumps into a well; The shocking incident cast a pall over the village | दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा

दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा

googlenewsNext

वाशिम : दारूड्या पतीकडून सातत्याने होणारा त्रास असह्य झाल्याने अखेर विवाहित महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतली. या घटनेत दोन्ही निष्पाप मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील रेगाव (ता.मालेगाव) येथे शुक्रवार, १४ एप्रिल रोजी ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला. या दाम्पत्यास दोन मुली झाल्या. दरम्यान, विकासला जडलेले दारूचे व्यसन काही केल्या सुटले नाही. दारू पिऊन आल्यानंतर तो आरतीचा छळ करायचा. त्याला कंटाळून ती ८ दिवसांपूर्वी दोन्ही मुलींना घेऊन माहेरी, रेगाव येथे आली होती.

१४ एप्रिल रोजी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आरतीने दोन्ही मुलींना सोबत घेऊन गावाबाहेर जाताना दिलीप घुगे यांनी वडिल बबन कांबळे यांना सांगितले. त्यानंतर बराचवेळ शोधाशोध केली; मात्र आरती आणि दोन्ही मुलींचा पत्ता लागला नाही. यादरम्यान रेगाव शिवारातील समृद्धी महामार्गाजवळ सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामानजिक गजानन घुगे यांच्या विहिरीत आरतीने दोन्ही मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतल्याचे समजले. तेथे काम करणाऱ्यांनी आरतीला जिवंत बाहेर काढले; मात्र दोन्ही मुलींचा मृतदेहच हाती आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी बबन कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलींच्या मृत्यूस कारणीभूत आरती विकास गवई हिच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ करीत आहे.
 

Web Title: A mother with two little girls jumps into a well; The shocking incident cast a pall over the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.