पीकविमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलनच
By नंदकिशोर नारे | Published: November 4, 2023 02:11 PM2023-11-04T14:11:52+5:302023-11-04T14:12:01+5:30
शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देन्यास कंपनीची टाळाटाळ
नंदकिशोर नारे
वाशिम - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२३ साठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली अग्रीम रक्कम देण्यास भारतीय पीक विमा कंपनी टाळाटाळ करत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याने जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागामार्फत पिकांचे सर्व्हे करुन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा निष्कर्ष निघाल्याने पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याच्या सूचना दिल्या. मात्र कंपनीने हे अमान्य करत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली त्यांनी सुनावणी करून कंपनीचे अपील फेटाळले. मात्र कंपनी पुन्हा राज्य सचिवांकडे अपील मध्ये गेली तिथेही सुनावणी होऊन २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याचे आदेश सचिवांकडून कंपनीला देण्यात आले. मात्र तरीही पीकविमा कंपनी शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यास तयार नाही.
विशेष म्हणजे राज्य सचिवांकडे सुनावणी वेळी वाशिम सह बीड व बुलढाणा जिल्ह्याची सुनावणी झाली. त्यांना अग्रीम रक्कम देण्यास कंपनी तयार आहे मात्र वाशिम जिल्ह्याचा दावा कंपनीने नाकारला आहे. यामुळे स्वाभिमानीने कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. लवकरच हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात येईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामुअण्णा इंगोलेकडून देण्यात आली.