शेजाऱ्याने कोरलेला बांध सॅटेलाइट टिपणार; आता प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स असणार
By दिनेश पठाडे | Published: January 13, 2024 06:00 PM2024-01-13T18:00:17+5:302024-01-13T18:01:33+5:30
जमिनीची मोजणी अचूक व जलद गतीने होण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत सर्व्हेक्षण संस्था या विभागाने महाराष्ट्र राज्यात ७७ निरंतर उपग्रहीय स्थान वाचन करणारी केंद्रे स्थापन केली आहेत.
वाशिम : जिल्हा भूमी अभिलेख विभाग हायटेक झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून आणखी १२ रोव्हर्स आणि ३६ लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन मोजणीशी निगडीत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे हे उपकरण उपलब्ध झाले आहे. परिणामी यापुढे शंभर टक्के मोजणी रोव्हर्सने केली जाणार आहे. प्रत्येक भूमापकास आणि कर्मचाऱ्यास रोव्हर्स व लॅपटॉप उपलब्ध झालेला वाशिम हा राज्यात पहिला जिल्हा ठरला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजीराव भोसले यांनी दिली.
जमिनीची मोजणी अचूक व जलद गतीने होण्यासाठी उपग्रहीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या भारत सर्व्हेक्षण संस्था या विभागाने महाराष्ट्र राज्यात ७७ निरंतर उपग्रहीय स्थान वाचन करणारी केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्राकडून अक्षांश, रेखांश व समुद्र सपाटीपासून उंची याचे अचूक निरीक्षण नोंदवून त्याचा उपयोग भूमापनासाठी करण्याचे शास्त्र विकसित केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले रोव्हर्स गतवर्षात उपलब्ध झाले होते. रोव्हर्सवर शंभर टक्के कामकाज आणि मागील वर्षभरापासून राज्याच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयाने विकसित केलेली जमीन मोजणीची ऑनलाइन ई-मोजणी २.० या जीआयएस पोर्टलवर काम करण्याचा मान राज्यात सर्वप्रथम वाशिम जिल्ह्याला मिळाला होता. या प्रणालीमुळे जमीन मोजणीशी संबंधित सर्व कामे गतीने होत आहेत. आधुनिकीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री शासनाने उपलब्ध केल्याने भूमीधारकांना गतिमान, अचूक व पारदर्शक सेवा मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. रोव्हर्सने मोजणी करून घेतली तर समोरच्याने किती बांध कोरला हे स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.
३१ रोव्हर्स, ६६ लॅपटॉप असणारा पहिला जिल्हा
वर्षभरापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खान प्रतिष्ठानमधून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी भूमी अभिलेख विभागासाठी मंजूर करुन १२ रोव्हर्स खरेदी केले होते. राज्याच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांनी ७ रोव्हर्स वाशिम जिल्ह्यासाठी दिले होते. एकूण १९ रोव्हर्स व ३० लॅपटॉपचा उपयोग करून जिल्ह्यात १०० टक्के जमीन मोजणी कामकाज रोव्हर्सवर करणारा राज्यातील पहिला जिल्हा वाशिम ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा १२ रोव्हर्स आणि ३६ लॅपटॉप उपलब्ध झाल्यामुळे जमीन मोजणी संबंधित असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे रोव्हर्स आणि लॅपटॉप असणारा वाशिम हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
यापूर्वी उपलब्ध असलेले एकूण १९ रोव्हर्स व ३० लॅपटॉप कमी पडत असल्याने पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ९७ लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. सदर निधीमधून १२ रोव्हर्स व ३६ लॅपटॉप खरेदी करुन त्याचे वाटप संबंधित कर्मचाऱ्यांना केले आहे - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख वाशिम