उभ्या ट्रकला धडक, ‘हायड्रोजन’चा ट्रक पेटला; चालक-क्लीनर गंभीर
By दिनेश पठाडे | Published: March 11, 2024 04:42 PM2024-03-11T16:42:54+5:302024-03-11T16:43:16+5:30
कारंजा तालुक्यातील लोकेशन १७६ वरील घटना
वाशिम : हायड्रोजन मोनॉक्साईड हे केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकने मार्गावरील उभ्या ट्रकला धडक दिल्याने ट्रकने पेट घेऊन ट्रक जळून खाक झाल्याची घटना ११ मार्चला सकाळी घडली. यामध्ये चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन १७५ म्हणजेच कारंजा तालुक्यातील दोनद या गावाजवळ घडली. बक्षीरसिंग (वय २५) व सरजीत बशीर (वय २५)अशी जखमींची नावे असून ते दोघेही पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार पी.बी.४६ डब्लू १७३८ क्रमांकाचा ट्रक छत्रपती संभाजीनगरहून नागपूर येथे हायड्रोजन केमिकल घेऊन जात असताना दोनद गावानजीक उभ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे दोन वाहनांमध्ये घर्षण होऊन हायड्रोजन घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. या घटनेत चालक व क्लीनर जखमी झाले. जखमींना समृद्धी महामार्ग १०८ चे डॉ. भास्कर राठोड व आतिश चव्हाण यांनी प्राथमिक उपचारांसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु तपासणी दरम्यान त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे पाठविण्यात आले. दुसऱ्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती कारंजा न.प.च्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियत्रंण मिळवले. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेत जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले.