जनावरांची वाहतूक करणारे वाहन युवकांनी पकडले; चालकाने धूम ठोकली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 05:35 PM2023-10-08T17:35:55+5:302023-10-08T17:36:12+5:30
सहा बैलांचे प्राण वाचले : १४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
वाशिम : विनापरवाना एका पिकअप वाहनातून जनावरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न कामरगाव (ता.कारंजा) येथील युवकांनी हाणून पाडला आहे. युवकांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने धूम ठोकली; परंतू शेवटी बाबापूर येथील ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यापुढे वाहनचालकाला नमते घ्यावे लागले. याप्रकरणी रविवारी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एका बोलेरो पिकअप वाहनातून गोधनाची व मासाची निर्दयीपणे वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने मूर्तिजापूर मार्गे बेंबळा-कामरगाव या मार्गावर कामरगाव येथील युवकांनी ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१० वाजताच्या सुमारास वाहनाला हात दाखवून थांबण्यास सांगितले. यावेळी वाहन न थांबविता चालकाने तेथून धूम ठोकली आणि वाहन बाबापूर शेतशिवारात जाऊन पोहोचले. एवढ्यात बाबापुर येथील ग्रामस्थांना माहिती देण्यात आल्याने त्यांनी वाहन थांबवून घटनेची माहिती पोलिसांना दिली. यावेळी एम. एच. ३० बी. डी.५१३१ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप मधून दीड लाख रुपये किमतीचे ६ बैल व काही मास आणि वाहन असा एकूण १४.५० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी पकडलेले ६ बैल पलाना येथील गौरक्षनात ठेवण्यात आले. याप्रकरणी कामरगाव येथील निवासी ललित गोपालदास मुंदडा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कारवाईदरम्यान या प्रकरणातील आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच कारंजाचे उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. घटनेचा अधिक तपास ठाणेदार योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी पुणेवार करीत आहेत.