शहीद अमोलच्या पार्थिवच्या प्रतिक्षेत वाशिमात देशभक्तीची लहर; शहरात जागाेजागी श्रध्दांजलीसाठी नागरिक दाखल
By नंदकिशोर नारे | Published: April 19, 2023 01:17 PM2023-04-19T13:17:03+5:302023-04-19T13:18:05+5:30
अमोलचे पार्थिव विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे आणण्यात आले.
वाशिम : भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात वापरी यांग बुंग नाला इस्ट कामेंग येथे सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय जवानाला वीरमरण आले. अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे १९ एप्रिल रोजी सकाळी पाेहचण्याआधी वाशिम शहरामध्ये जागाेजागी डिजे लावून देशभक्ती गिताची लहर दिसून आली. यावेळी जागाेजागी श्रध्दांजली देण्यासाठी हजाराे नागरिक उपस्थित हाेते. दुपारी १ वाजेपर्यंत भरउन्हात अमाेलच्या पार्थिवाची नागरिक प्रतिक्षा करताना दिसून आलेत.
अमोलचे पार्थिव विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे रवाना करण्यात आले. वाशिम शहरात सकाळी ते पाेहचणार असल्याने वाशिम शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्यात आली हाेती. चाैकाचाैकामध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यामध्ये शहरातील नागरिकांसह विविध शाळेतील विद्यार्थी माेठया प्रमाणात उपस्थित हाेते.